Monday, 11 December 2017

शिनचॅन नगर ऑफ पुणे:


गेल्या रविवारी दुपारी आयटी एक्सपो 2017 बघायला मी आणि माझा मुलगा अथर्व प्रथम युनिव्हर्सिटी रोड वरच्या कृषी विद्यापीठाच्या गेट वर चुकून गेलो हे तिथे गेल्यावर कळलं. कारण रिक्षावाला म्हणाला की हेच कृषि विद्यापीठ मैदान आहे. मग तेथून एकाने आम्हाला ईस्क्वेअर मल्टिप्लेक्स जवळचे गेट सुचवले, तिथे चालत गेलो तर तिथेही कोणतेच प्रदर्शन नव्हते. मग प्रदर्शन नेमके आहे कुठे? 


तिथल्या एका विद्यार्थ्याने मला सांगितले की पुणे सेंट्रल जवळून रिक्षा करा आणि रेंज हिल्स रोडवरच्या सिंचन नगर मैदानात जा तिथेच प्रदर्शन भरले आहे आणि त्यालाच कृषि विद्यापीठ मैदान म्हणतात. मग आम्ही तेथे गेलो पण आमच्या कार्टून्स च्या जगात आखंड बुडालेल्या मुलाने प्रश्न केला, "पप्पा, पुण्यात शिनचॅन नगर पण आहे?"

नामसाधर्म्यामुळे झालेल्या गोंधळाने मला हसू आले.


"अरे बेटा, सिंचन नगर म्हणतात त्याला. सिंचन म्हणजे इरिगेशन किंवा पिकांवर पाणी स्प्रिंकल करतो ना ते!"


मुलाला वाटलं असावं परदेशात जसे पिकाचूचे उत्सव होतात तसे या मैदानात कदाचित भरपूर शिनचॅन बघायला मिळतील आणि गेट जवळ येऊन ते वेलकम वगैरे करतील!"


(पिकाचू: एक प्रकारचा पिवळा गोंडस पोकेमोन;

शिनचॅन: एक प्रकारचे अती वात्रट आणि महा आगाऊ कार्टून पात्र)

"वलय" (सिनेटीव्ही क्षेत्रावर आधारित माझ्या आगामी कादंबरीचा ट्रेलर)

सिनेटीव्ही क्षेत्रावर आधारित मी लिहिलेल्या "वलय" या आगामी कादंबरीचा संपूर्ण ट्रेलर खाली वाचा!!
तुम्हाला मनोरंजनाच्या झगमगाटात दिपवून टाकायला हे "वलय" लवकरच येत आहे! फक्त थोडी वाट बघा...
-निमिष सोनार
_________________________________
Selected Scene # 1

“राजेश, मला कल्पना आहे या सगळ्यांची! पण मला ते सगळं मान्य असेल!”

“हे बघ! प्रॅक्टिकली विचार कर सुप्रिया. तू आणि मी दोघेही या बेभरवशाच्या क्षेत्रात एकत्र येऊन भरवशाचा संसार नाही करू शकत!”

“राजेश, मनापासून ठरवलं तर सगळं काही करू शकतो आपण! आपण दोघेही मेहनत करून आपला संसार यशस्वी करू!”


Selected Scene # 2

"डेली सोपच्या कथेमध्ये डेली बदल होत असतात आजकाल! वाचकांच्या सोशल मिडीयावरील प्रतिसादांवरून आणि TRP च्या आधारे! काय समजलास? याला आम्ही म्हणतो डेली ‘सोप’ विथ ‘शांपू’ तडका!" डायरेक्टर हसत म्हणाला.

Selected Scene # 3

एंजेलिना त्याला इटालियन भाषेत खूपच टाकून बोलली होती - "आंद्रे अल इन्फर्नो कोन ला तूआ रगझ्झा!'

म्हणजे - "म्हणजे तुझ्या गर्लफ्रेंड सोबत तू मसणात जा!"
त्याला बोलायचा चान्स न देताच तिने त्याला शिवीगाळ केली होती.

तिचा गैरसमज झाला होता. ती ज्या गर्लफ्रेंडबद्दल बोलली होती ती फ्रांकोची गर्लफ्रेंड नव्हती. त्याने लाख समजावण्याचा प्रयत्न केला पण...

ती ऐकत नव्हती.

Selected Scene # 4

ती बंदूक खाली उचलण्याचे नाटक करत तो माणूस खाली वाकतो आणि वायूवेगाने मागच्या बाजूला पाय फिरवून स्टेनगन वाल्याला आणि लोखंडी दांड्यावल्या माणसाला एकाच वेळेस खाली पाडतो.

स्टेनगन आणि दांडा दूर जाऊन पडतात. आता तिघेही शस्त्र विहीन असतात.

तिघेही धडाधड एकमेकांना भिडतात. हातापायांचे वार आणि थापडा एकमेकांना बसू लागतात. त्याचा चटाचट आवाज येऊ लागतो...

बराच वेळ तिघांमध्ये धुमश्चक्री चालते.
तो एकटा दोघांना भारी पडतो...

Selected Scene # 5

पलीकडून आवाज आला, “जानू, पहचाना मुझे?”

तो आवाज ऎकताच ती एकदम अस्वस्थ झाली. चमचा तसाच ताटात ठेवून ती डायनिंग टेबल वरून उठली आणि अस्वस्थपणे बोलत बोलत बेडरूम मध्ये गेली. जेवतांना त्या काॅलवर बोलणे तिच्यासाठी जवळपास अशक्य होते.

“क क कौन? रा राहुल गुप्ता?” घाबरत रागिणी बोलली.

“अरे वा! ठिक पहचान लिया तूने! लेकीन पहचानने में इतना समय लगा कमिनी तुझे? सहर में जाकर भूल गयी तेरे अशिक को?”, तो आवाज गावंढळ आणि उद्धट वाटत होता.

“सबसे बडा कमिना तो तू है नालायक! मेरा नंबर कहाँ से मिला तुझे?” रागिणीही काही कमी नव्हती.

“वो सब छोड और सुन! मुझे पचास हजार रूपिया दे दे, नही तो मै तेरा नंबर तेरे हजबंड को दे दूँगा और तेरे बारे में सबकुछ बता दूँगा!”

रागिणी आता घाबरली. फोन तिच्या मूळ शहरातून म्हणजे दिल्लीहून होता. या माणसाला आता पैसे देण्यावाचून पर्याय नव्हता. नंतर त्याला बघता येईल. आता त्याच्याशी उलझण्याइतका तिच्याकडे वेळ, मानसिकता आणि उत्साह नव्हता. मात्र या माणसाची मजल पैसे मागण्यापर्यंत जाईल असे तिला वाटले नव्हते. पण सध्या त्याला चूप करणे तिला आवश्यक होते.

Selected Scene # 6

दोनच दिवसात सगळीकडे आणि जागोजागी तिचा सेल्फी फॉरवर्ड होऊ लागला....

...सगळीकडे त्या सेल्फिवरुन न्यूज चॅनेलवर अर्ध्या अर्ध्या तासांचे प्रोग्राम तयार होऊन टेलिकास्ट व्हायला लागले....
काही म्हणत होते, “आता अश्लीलतेकडे झुकायला लागलेत डान्स प्रोग्राम. ते आता घरच्यांसोबत बघण्याच्या लायकीचे राहिले नाहीत!”

घराघरांत, नाक्या नाक्यावर, स्कूल कॉलेजांत आणि ऑफिसच्या सहकाऱ्यांमध्ये त्या सेल्फीवरून वेगवेगळ्या गप्पा रंगू लागल्या....

एका घरात –

“मम्मी मम्मी, मी पण मोठेपणी त्या सेल्फिवाल्या मुलीसारखी होणार! खूप खूप नाचणार! नाच नाच नाचणार!”

“गप बस! बंद कर तो टिव्ही आणि चल हो घरात, अभ्यास कर! मोठं होऊन सासरी जायचंय तुला! चाल्लीय मोठी डान्सर व्हायला!”

दुसरीकडे एका घरात –

“या असल्या फालतू पोरींच्या फालतू सेल्फीमुळे ज्या मुलींना खरोखर डान्स मध्ये खरोखर काहितरी करून नाव कमवायचं आहे त्या पोरी पण नाहक बदनाम होतात. कसे काय यांचे आई वडील यांना असे करू देतात, देव जाणे!”

Selected Scene # 7

"हे बघा! सामान्य माणूस तिकीट काढून पैसे खर्च करून दोन अडीच तास चित्रपट पाहण्यासाठी येतो ते दोन घटका मनोरंजन करायला! सॉरी मी दोन अडीच तास म्हणालो कारण आजकाल चित्रपट पूर्वीसारखे तीन साडेतीन तासांचे राहिले नाहीयेत! आणि आजच्या मल्टिप्लेक्सच्या जमान्यात तर एका तिकिटाला दोनशे ते पाचशे रुपये पडतात. एवढे पैसे खर्च करून फक्त दोन तासांचा सिनेमा असतो, त्यातही जर समोर पडद्यावर डोक्याला जड असे काहीतरी बघायला मिळाले तर प्रेक्षक शिव्या देईल! चित्रपट प्रेक्षकाला दोन घटका करमणूक देण्यासाठी असतो आणि मसाला फॉर्म्युला त्यासाठी पुरेसा आहे. त्यासाठी लेखकाची गरज नाही. मला तरी नाहीच नाही!"

राजेश म्हणाला, "अहो तुम्ही फॉर्म्युला सांगणार होतात ना! सांगा ना एखादा फॉर्म्युला आम्हाला!"

छब्बीसिया सांगू लागला, "समजा रोमँटिक मुव्ही घेऊ! एक हिरो घ्यायचा एक हिरोईन घ्यायची! मग त्यांची भेट एखाद्या परदेशातल्या एका सुंदर नयनरम्य ठिकाणी घडवायची. चार पाच नाचगाणी. रुसवे फुगवे. तिथल्या एखाद्या पब, डिस्को किंवा क्लबमध्ये एकादे सेक्सी आयटम सॉंग टाकायचे. वर आम्ही सेन्सॉरला असे म्हणायला मोकळे की हे अंगप्रदर्शन जास्त वाटत असला तरी ते परदेशात घडतंय, आपल्या भारतात थोडंच घडतंय! आणि मग हिरोईनचे वडील तिच्या मर्जीविरुद्ध लग्न लावून देतात. मग त्या नियोजित वराच्या ओढून ताणून वाईट सवयी दाखवायच्या आणि मग हिरो ते उघडकीस आणतो आणि मग थोडी मारामारी आणि मग हॅपी एंडिंग! माझा पिक्चर "दुल्हन हमारी हिंदुस्तानी" बघितला ना तुम्ही??"...

छब्बीसिया पुढे म्हणाला, "हा होता रोमँटिक चित्रपटाचा एक फॉर्म्युला. तसेच ऍक्शन चित्रपटाचाही माझा एक फॉर्म्युला आहे. मी जवळपास सत्तर ऐशी मोडक्या तोडक्या गाड्या गैरेज मधून विकत घेतो आणि चित्रपटभर त्या गाड्या बॉम्बने उडवत राहातो! गाड्यांचे पाठलाग, ऍक्सिडेंट करत राहातो, गाड्या तोडतो फोडतो. प्रेक्षकांना आवडतं! मी लहानपणी माझ्या स्वतःच्या आणि मित्रांच्या खेळण्यातल्या कार तोडून टाकायचो, दिवाळीत गाड्या सुतळी बॉम्बला बांधून त्यांना फोडून ब्लास्ट करून टाकायचो तेव्हाच माझे एक बॉलिवूडमधले काका बोलले होते की हा मोठा झाल्यावर नक्की एक मोठ्ठा ऍक्शन डायरेक्टर किंवा प्रोड्युसर होणार! खि खि खि!"......

राजेश म्हणाला, "मुळात तुमचे हे जे फॉर्मुले आहेत ते कोठून आलेत? ते तुमचे स्वतःचे नाहीत. एखाद्या लेखकाची एखादी कादंबरी हिट होते त्यावर पिक्चर बनतो आणि मग त्याची कॉपी करून तसे अनेक पिक्चर बनतात आणि मग त्याचा फॉर्म्युला होतो. म्हणजे त्याचे श्रेय लेखकालाच जाते शेवटी! अर्थात असेही असेल की एखादा दिग्दर्शक मुळातच एक प्रतिभावान लेखक किंवा संवाद लेखक असू शकतो. असा योग म्हणजे दुग्धशर्करा योग्य किंवा सोने पे सुहागा म्हणावा लागेल! पण विजय शेवटी लेखकाचाच!"

Selected Scene # 8

"काय गरज होती एवढ्या महाग ब्लेझरवर खर्च करण्याची? खरं म्हणजे सारख्या सारख्या पार्ट्यांना जायची गरजच काय म्हणते मी?"

ऐन पार्टीच्या तयारीआधी अचानक हे प्रश्न आल्याचे बघून प्रथम त्याला आश्चर्य वाटले पण त्यातल्या त्यात काहीतरी उत्तर द्यायचे म्हणून शक्य तेवढ्या संयमाने तो म्हणाला,

"असं बघ, आता विकत घेतलाच आहे हा ब्लेझर तर घालू दे ना मला. मग तो घ्यायची आवश्यकता होती की नव्हती हे नंतर पार्टीहून परतल्यावर आपण ठरवू!"

"हो का? बरंय बुवा तुमचं झगमगतं जग! बरं पण एकटेच तयारी करता आहात, मला विचारलं नाही की चलतेस का म्हणून?"

"अगं, तुला काल विचारले की आजच्या पार्टीला येणार का तर तू नाही म्हणाली होतीस आणि आता??"

"एकदा नाही म्हटलं तर तेच धरून ठेवलं? परत विचारता येत नाही? एवढी का मी नकोशी झालेय तुम्हाला!"

"बरं, आता विचारतो! परत विचारतो! चलतेस का?"

"मी लक्षात आणून दिल्यावर मग तुम्ही मला आमंत्रण देता? आता तर मी मुळीच येणार नाही तुमच्यासोबत. पण घरी लवकर या! शक्यतो अकरा वाजेपर्यंत परत या!"

"लवकर येणं शक्य नाही! तुला चांगलं माहिती आहे की अशा पार्ट्यांना रात्री उशीर हा होतोच! तू आधी आली आहेस अशा प्रकारच्या पार्ट्यांना एक दोनदा आणि तुला चांगलं माहिती आहे !"

"आली होती म्हणूनच सांगतेय की लवकर या! की कुणी आहे एखादी सटवी तेथे तुम्हाला सोबत करायला? गळ्यात गळा घालून नाचायला? मागच्या पार्टीत ती बया.. तुमच्या सारखी एक फिल्मी पत्रकार.. काय नाव होतं तिचं बरं? किती जवळ जवळ करत होती तुमच्या? काय ती बया कपडे घालते आणि काय सगळं अंग अंग मिरवते, शी बाई!?"

Selected Scene # 9

आई म्हणाली, "रिलॅक्स, बेबी! असे तोडफोड करून काहीच होणार नाही. शांत हो!"

"त्या @#*%ला मी धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही."

"तिने तुझे काय बिघडवले आहे ? तिला दोष देऊ नकोस!"

"तिने माझा हक्काचे काम हिरावले माझ्यापासून! माझे वलय, माझे ग्लॅमर हिसकवले आहे तिने माझ्यापासून!"

"बेबी! हे तर चालायचंच या फिल्म इंडस्ट्रीमध्ये! तिने ते काही मुद्दाम केलेले नाही हे तुला माहितेय! तिच्याकडे संधी आली आणि तिने ती स्वीकारली!"

"पण तिने माझी जागा घेतली त्याचे काय? नाही! मी तिला असं करू देणार नाही! ती पिक्चर करेन आणि मी इथे गाशा गुंडाळून स्वस्थपणे बसणार? मुळीच नाही!"

"अगं, मग तू करणार आहेस तरी काय?"

"मी परत मुंबईला जाणार!"

"अगं, तुझी हालत ठीक नाही. तिथे जाऊन काय करणार?"

"माझी हालत ठीक आहे! सगळं ठीक आहे. यापूर्वीही मी डिप्रेशनमधून सावरले होते! आतासुद्धा मी सावरले आहे! मी परत जाणार!!"

"हे बघ बेबी! इथे कोलकात्याला पुन्हा तू थिएटर मध्ये काम करायला लाग!"

"नाही, मी बरी आहे! मी उद्याच पुन्हा मुंबईला जाणार!"

"थोडक्यात गीतेचा उपदेश"

(स्टार प्लस वरील 2013 साली गाजलेल्या महाभारतातील गीतेच्या उपदेशावर आधारित)

कुरुक्षेत्रावर जेव्हा युद्ध करण्याचे अर्जुनाने नाकारले तेव्हा त्याला समजावताना आणि विविध वैदिक उपदेश करतांना म्हणजेच भगवदगीता सांगताना एका क्षणी श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, 

"कर्म कर पण ते करतांना फलाची अपेक्षा ठेवू नको म्हणजे त्या फलाशी तू बांधला जाऊन तुला ते फळ भोगावे लागणार नाही! म्हणून फळाची अपेक्षा न करता युद्ध (करण्याचे कर्म) कर जे कोणत्याही क्षत्रियाचे कर्तव्य असते! कारण आपल्याला नेमून दिलेले कर्तव्य करावेच लागते. त्याशिवाय आपला आत्मा ज्या शरीरात सध्या वास करत आहे त्या शरीराचा उदर निर्वाह तू कसा करणार?"

अर्जुन म्हणाला, 

"पण युद्धाच्या कर्माने मी बांधलो नाही का जाणार? युध्दात माझे नातेवाईक आणि अन्य लाखो लोक माझे हातून मारले जाऊन मला पाप नाही का लागणार?"

श्रीकृष्ण हसले आणि म्हणाले, 

"हे सगळे लोक विविध अविनाशी आत्मे आहेत, जे शरीर धारण करून समोर उभे राहिले आहेत. त्यांची येथे फक्त शरीरे मरतील, आत्मे नाही. पण आत्मे मुक्त होतील. त्याची शरीरे मारण्याचे तुला पाप तेव्हाच लागेल जेव्हा तू युद्ध करताना युद्धाच्या फळावर नजर ठेऊन असशील जे चूक असेल. म्हणजे जिंकलास तर सुख आणि अहंकार, तसेच स्वतःचा काहीतरी स्वार्थ किंवा फायदा बघशील तसेच आणखी जग जिंकण्याची इच्छा धरशील आणि हरलास तर दुःख आणि निराशा तुला घेरतील असा विचार करत युद्ध करू नकोस!!

त्याऐवजी निष्काम भावनेने कर्म (युद्ध) कर. मनात युद्धाच्या कोणत्याच भावी परिणामांची चिंता न करता तटस्थ भावनेने युद्ध कर, म्हणजे त्याच्या फळाच्या परिणामांपासून तू मुक्त राहशील!"

अर्जुन म्हणाला, 

"पण काहीही केलं तरी कर्माने आपण बांधले जातो म्हणून मी सगळे कर्म करणे यापुढे थांबवून, हे जग त्यागून सन्यास घेतला तर ते युद्ध करण्यापेक्षा चांगले नाही का होणार?"

श्रीकृष्ण म्हणाले, 

"असे तुझ्यासारखे धर्माच्या बाजूने असणारे लोक जेव्हा असा कर्म आणि संसार त्यागण्याचा विचार करतात तेव्हा मग दुर्योधनासारखे अधर्मी लोक आपले दुष्कर्म करायला मोकाट सुटतात! 

तुझा कर्म त्यागण्याचा विचार म्हणजे जिभेला स्वाद घेऊ द्यायचा नाही म्हणून जेवणच करणे बंद करणाऱ्या माणसासारखे आहे. असा जेवण बंद करणारा माणूस जितके दिवस जेवण बंद करेल तितके दिवस त्याला मनात त्या स्वादाची आठवण पुन्हा पुन्हा जास्त तीव्रतेने येत राहील, म्हणजे न जेवताही स्वादाची इच्छा त्याला कर्म फलात बांधते आहे. त्यापेक्षा त्या माणसाने स्वादाची इच्छाच मनातून नाहीशी केली तर? 

त्याचप्रमाणे कर्म हे फळ निर्माण करतात म्हणून कर्मच करणे बंद करून टाकण्यापेक्षा कर्माच्या परिणामांच्या इच्छा (सकारात्मक किंवा नकारात्मक भावी फळाच्या अपेक्षा) मनातून नष्ट करणे योग्य नाही का? 

असे कर्म केल्याने त्याचे फळ निर्माण झाले तरी ते भोगण्यापासून तू मुक्त असशील, म्हणजे ते तुला भोगावे लागणार नाही! त्या कर्मफळाच्या पाप पुण्यापासून तू मुक्त राहशील!"

पण अर्जुनाने आणखी एक शंका उपस्थित केली, 

"पण माधव, आपली संस्कृती दया आणि करुणा शिकवते. हे सगळे अधर्मी आत्मे तुम्ही पूर्वी सांगितल्याप्रमाणे अज्ञानात आहेत आणि सर्व सृष्टी व्यापून उरलेल्या परमात्म्याचे आपण अंश आहोत आणि अधर्म करून आपण परमात्म्याला विसरून त्याचेपासून दूर जात आहोत हे त्यांचे लक्षात येत नाही आहे मग अशांना मारण्यापेक्षा त्याचे अज्ञान दूर करून त्याचेवर दया दाखवणे योग्य नाही का?"

यावर भगवान श्रीकृष्ण म्हणाले, 

"या सगळ्यांनी तुझ्यासोबतच शिक्षण घेतले आहे, त्यांनाही तुझ्यासोबत हे वेदज्ञान मिळाले आहे (आत्मा परमात्मा याबद्दल), पण तरीही ज्ञानी असूनही मुद्दाम अधर्म करत राहणाऱ्यांना दंड देणे हीच एक प्रकारची त्यांना दाखवलेली दया आहे. 

लक्षात ठेव - तीन गुणांच्या कमी अधिक मिश्रणाने  व्यक्ती बनतो. 

"तामसिक" म्हणजे कोणतेही ज्ञान मुद्दाम दुर्लक्षित करून अविचाराने कृत्य करत राहाणे जसे की दुर्योधन, दुःशासन वगैरे. 

"सात्विक"  म्हणजे हे सगळे वैदिक ज्ञान अंगिकारून त्याप्रमाणे धर्माच्या मार्गावर चालणारे लोक जसा तू, युधिष्ठिर वगैरे. 

आणि कळत असून वळत नसणारे मधले लोकं म्हणजे "रजासिक" जसा की कर्ण! 

यांचे सगळ्यांचे अज्ञान दूर करण्याची वेळ आता कधीच निघून गेली आहे. आता युद्ध करून यांना दंड दिल्याशिवाय दुसरा मार्ग नाही हे मी स्वतः परमात्मा म्हणजे भगवंत तूला सांगतो आहे. तेव्हा हे अर्जुना, युद्ध कर!"
लेखक: निमिष सोनार, पुणे

स्पायडर मॅन, माधुरी दीक्षित आणि दात:

स्पायडर मॅन, माधुरी दीक्षित आणि दात: 

जेव्हापासून आम्ही आमच्या अडीच वर्षाच्या आरोहीला सांगत आलो की गोड खाऊ नये दात किडतात त्या दिवसापासून टिव्ही किंवा पेपर मध्ये दात दिसत असणारा कोणताही हसरा चेहरा तिच्या पाहण्यात आला की ती उलट आम्हाला समज द्यायला लागली, "याचे दात किडले कारण याने जास्त चॉकलेट खाल्ले, जास्त चॉकलेट खाऊ नये. दात किडतात." 

एकदा टूथपेस्टच्या जाहिरातीत असलेल्या सुहास्य करणाऱ्या माधुरीला ती म्हणाली, "हीचे दात किडले पप्पा! हिने खूप लॉलीपॉप खाल्ले!" आम्ही हसायला लागलो. 

हे ऐकताच माधुरीने स्मितहास्य थांबवले आणि कसंबसं गालातल्या गालात हसली.
हद्द तर तेव्हा झाली जेव्हा टिव्हीवर स्पायडर मॅन झोके घेत घेत उड्या मारत होता आणि आरोही म्हणाली, "याचे दात कीडले पप्पा, याने चॉकलेट खाल्ले!"
चेहऱ्यावर मास्क असूनही या मुलीने आपल्या दातांबद्दल असे सांगितल्याने बिचाऱ्या स्पायडर मॅनला धक्का बसला, त्याचे लक्ष विचलित झाले आणि त्याचा दोरीचा अंदाज चुकल्याने तो बिल्डिंग वरून धाडकन खाली पडला. 
"पप्पा, बघा कसा पडला तो, दात तुटले त्याचे!"

मी मनात म्हटलं, "बहुतेक त्याचे किडलेले दात तुटले असावेत!" 
(मास्कच्या आतमध्ये!)

तीस रुपया एक्स्ट्रॉ गीरेंगा

"मीटर से तीस रुपया एक्स्ट्रॉ गीरेंगा साब!" 
(गिरेंगा?? क्या कौन किधर?) 

"तिकडून आम्हाला एमटी यायला लागंल, दोनशे रुपये होतील!"
(एमटी? असं वाटतंय आता याला चांगली गरम आमटीच खाऊ घालावी! आलाय मोठा एमटी!!) 

"एवढ्या दूर मला आता जायला लावताय व्हय? नाय जात तिकडं मी आता, मला आता घरी जायचंय, रात बी लय झालिया!" 

(हो का? मग इथे का थांबलात विनाकारण आणि कुणाची वाट बघत?? की तुम्हाला घरी जायचंय हे सांगायला माझ्यासारख्या कुणाची तरी वाट बघत होता?)"लय पाऊस पडतोय, ट्रॅफिक बी लई असते तिकडे म्हणून मीटर पेक्षा पन्नास रुपये जास्त द्यायला लागतील, बघा जमतंय का!"- हे आहेत पुण्यातील रिक्षावाल्यांचे सुप्रसिद्ध (की कुप्रसिद्ध) डायलॉग! 

Monday, 20 November 2017

कलो गीतानो

संगीत प्रेमींनी हे जरूर वाचा! तुम्ही टेक्नो सेव्ही संगीत प्रेमी असाल तर कदाचित गुगलचे हे फिचर तुम्हाला माहीत असेलही पण ज्यांना माहित नसेल त्यांचेसाठी हा लेख. आज माझ्या मुलाने (atharv sonar) मला एक गुगल व्होईस सर्चचे एक अनोखे फिचर सांगितले. मोबाईल मध्ये गुगलवर आपण व्होईस सर्च करू शकतो हे आतापर्यंत प्रत्येकाला माहिती असेलच. पण, आपण जर सर्चचा माईक सुरु करून दुसऱ्या एखाद्या मोबाईल मधून कोणत्याही गाण्याची कोणतीही ओळ किंवा फक्त धून किंवा फक्त संगीत वाजवले (गाण्याचे सुरुवातीचे किंवा मधले किंवा शेवटचे!) तर गुगल लगेच आपल्याला ते गाणे/संगीत कोणते आहे हे शोधून देतं. आहे की नाही कमाल? आता तुम्ही म्हणाल की यात विशेष काय आणि याचा फायदा काय? सांगतो.

तुम्ही एखाद्या ठिकाणी प्रवासात गेलात आणि कुठेतरी कोणतेतरी गाणे सुरु आहे, जे तुमच्या ओळखीचे नाही, पण ते तुम्हाला आवडले तर मग तुम्ही ते पटकन मोबाईल मध्ये (दुरून असले तरी) रेकॉर्ड करा. अगदी एका मिनिटासाठी जरी असले तरी हरकत नाही. मग दुसऱ्या मोबाईल मध्ये (किंवा तुमच्या कॉम्प्यूटर किंवा laptop वर) गुगल सर्चचा माईक चालू करून ती धून वाजवा. मग, गुगलला समजतं की हा व्होईस नसून म्युझिक आहे. मग कोपऱ्यात अजून एक ऑप्शन येतं ते म्हणजे म्युझिकचं एक चिन्ह दिसतं! त्यावर क्लिक करा, मग गुगल तुम्हाला ते गाणं क्षणार्धात ओळखून देईल! कोणत्याही भारतीय किंवा जागतिक भाषेतले असले तरी!

मी फार पूर्वी एका ऑनलाईन रेडियोवर ऐकलेलं पण एका मिनिटाची रेकोर्डिंग असलेलं, वेगळ्याच भाषेतलं एक गाणं या पद्धतीने सर्च केल्यावर कळलं की ते फ्रेंच भाषेतलं एक गाणं असून त्याचे लिरिक्स पण समजले (इंग्रजीतून शोधल्यावर), ते होतं Kendji Girac याचं "Color Gitano" हे गाणं! लागल्यास तुम्हीही हे गाणे ऐकून बघू शकता. तुम्हालाही आवडेल. मला सुधा फ्रेंच कळत नाही, पण भाषा जरी नाही समजली तरी संगीत ही एक वैश्विक भाषा असते. नाही का? 

Mi vida, mi sabor
Mi fuerza, mi amor
Color Gitano
Ma raison, mes valeurs
Ma maison, ma couleur
Color Gitano

- निमिष सोनार (एक संगीतप्रेमी), पुणे

सदा सूखे रहो

अशा creativity ला मनापासून दाद द्यावीशी वाटते: 

Zeel Rainwear ची एक advertisement एका रिक्षेमागे वाचली त्याची tagline अशी होती -

"सदा सूखे रहो!"